पुणे : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पोर्टफोलियो तयार करण्यासाठी आलेल्या मॉडेलने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार करेन, अशी धमकी देऊन फोटोग्राफरकडून खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बिबवेवाडी येथील फिर्यादी यांच्या फोटो स्टुडिओमध्ये ६ ते १५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडला आहे.
या प्रकरणी बिबवेवाडी येथे राहणार्या एका ४३ वर्षीय फोटोग्राफरने बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फोटोग्राफर आहेत. बिबवेवाडी येथे त्यांचा फोटो स्टुडिओ आहे. आरोपी महिला मॉडेल असून त्या मुळच्या सोलापूर येथील रहिवाशी आहेत. सध्या त्या नर्हे येथे राहतात. त्या मॉडेल आरोपी महिलेला आपला पोर्टफोलियो तयार करायचा होता. त्यासाठी त्यांनी फिर्यादी यांना पोर्टफोलियो तयार करण्यासाठी सांगितले होते.
दरम्यान, पोर्टफोलियो तयार करण्यासाठी लागणार्या फोटो शुटसाठी त्या ६ नोव्हेंबर २०२४ रोजी फिर्यादीच्या फोटो स्टुडिओमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी यांनी आता लगेच फोटो शुट होऊ शकत नाही. असे सांगून आपण नंतर फोटो शुट करु, असे सांगितले. त्यावर नाराज होऊन या मॉडेलने तुझ्यावर ३७६ ची केस करेन अशी धमकी दिली आहे. त्यानंतर त्यांच्याकडे वारंवार तिने पैशांची मागणी केली. तिच्या धमकीला घाबरुन त्यांनी या मॉडेलला आत्तापर्यंत तब्बल २० हजार रुपये दिले आहेत.
मात्र, तरी देखील ती परत देखील पैशांची मागणी करत होती. पैसे दिले नाही तर तुझ्या स्टुडिओमध्ये येऊन मारहाण करून तुला शिवीगाळ करेन, अशी वारंवार धमकी देत असे. त्यामुळे शेवटी फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विद्या सावंत करीत आहेत.