पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून रविवार, १० नोव्हेंबर रोजी राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या टीईटी परीक्षेवेळी उमेदवारांचे परीक्षा केंद्रात प्रवेश करताना बायोमेट्रिक घेतले जाणार आहे. तसेच मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने फ्रिस्किंग, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा लाइव्ह अॅक्सेस आणि आर्टिफिशियल इंटेलिजिन्सच्या मदतीने उमेदवार व पर्यवेक्षकांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. टीईटी परीक्षेच्या आयोजनाबाबत परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक उपस्थित होत्या.
परीक्षा केंद्रात प्रवेश करताना प्रत्येक उमेदवाराचे आणि परीक्षेच्या कामकाजात कार्यरत कर्मचाऱ्यांचे मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने फ्रिस्किंग केले जाणार आहे. त्यामुळे कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, मेटलचे साहित्य विद्यार्थ्यांना घेऊन परीक्षा केंद्रात जाता येणार नाही. परीक्षार्थ्याने अर्ज भरताना छायाचित्र दिलेले आहे. सर्व उमेदवारांच्या छायाचित्रांचा डाटा बेस तयार केला आहे. उमेदवार परीक्षा केंद्रात प्रवेश करत असताना त्यांचे बायोमेट्रिक घेतले जाणार आहे. त्याआधारे त्याची हजेरी लावली जाणार आहे. त्यानंतर छायाचित्र काढून हे छायाचित्र अर्जातील छायाचित्राशी जुळते की नाही, याची खातरजमा करूनच उमेदवारास प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे तोतया विद्यार्थ्याला प्रतिबंध होईल.
परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक परीक्षा दालनात व केंद्र संचालकांच्या कक्षात सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. तसेच या कॅमेऱ्याचा लाइव्ह अॅक्सेस जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे कार्यालय व राज्यस्तरावर परीक्षा परिषदेत घेण्यात आला आहे. तसेच एआय यंत्रणेद्वारे सातत्याने नियंत्रण ठेवले जाणार आहे. परीक्षा केंद्रात काही गैरहालचाली झाल्यास तत्काळ प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात व परीक्षा परिषदेतील नियंत्रण कक्षात अलार्म येणार आहे.
यंदा राज्यभरातून ३ लाख ५३ हजार ९३७ उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. एकूण १ हजार २३ केंद्रांतील जवळपास १६ हजार वर्गखोल्यांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलगू, गुजराती, सिंधी अशा नऊ माध्यमांमध्ये घेतली जाणार आहे. पेपर एकसाठी १ लाख ५२ हजार ५९७ इतक्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे. पेपर दोनसाठी २ लाख १ हजार ३४० उमेदवारांनी नोंद केली. दोन्ही पेपरसाठी ७५ हजार ९९६ उमेदवारांनी नोंदणी केली. पुरुष उमेदवारांची संख्या १ लाख १६ हजार ५२६, तर महिला उमेदवारांची संख्या २ लाख ३७ हजार ४१७ इतकी आहे. तृतीयपंथी उमेदवारांची संख्या ९ इतकी आहे. तसेच ४ हजार ८८७ दिव्यांग उमेदवारांचे अर्ज आले आहेत. दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
दीड तास अगोदर येण्याच्या सूचना
टीईटीचा पेपर एक सकाळी १०.३० ते १ या वेळेत, तर पेपर दोन दुपारी २.३० ते ५ या वेळेत होणार आहे. परीक्षेसाठी दीड तास अगोदर उमेदवारांनी परीक्षा केंद्रात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. उमेदवारांची दोन-तीन टप्प्यांत तपासणी होणार असल्याने यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून दीड तास अगोदर बोलावण्यात आले आहे. उत्तरपत्रिकेत गुण वाढवण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी यंदा तीन प्रतींमध्ये ओएमआर असून एक मूळ प्रत व दोन कार्बनलेस प्रती दिल्या जाणार आहेत. त्यापैकी एक प्रत परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी आपल्याकडे जतन करून ठेवतील, दूसरी प्रत परिषदेच्या कस्टडीमध्ये सुरक्षित असेल, तर मूळ प्रत पुढील निकालापर्यंत कार्यवाहीसाठी वापरण्यात येईल.