उरुळी कांचन : कोरेगाव मुळमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रिंगरोड जमिनीच्या व्यवहारातील पैशांच्या वादातून दोन शेतकऱ्यांवर एका उद्योजकाकडून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली केली आहे. जखमींवर लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी (ता.१४) रोजी कोरेगाव मुळ (ता.हवेली) येथील इमानदार वस्ती येथे घडली आहे. घटनेची माहिती मिळताच ऊरुळी कांचन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. संशयीत आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हवेली तालुक्यांतील ग्रामीण पोलीस दलातील ऊरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव मुळ हद्दीतील इमानदार वस्ती येथील एका बड्या उद्योजकाच्या घरात रिंगरोडच्या जमिनीमध्ये गुंतवणूक केलेले पैसे मागण्यासाठी दोन शेतकरी गेले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि त्या वादाचे रूपांतर गोळीबारात झाले.
या वादात उद्योजकाने शेतकऱ्यांवर आपल्या पिस्तुलातून दोन राऊंड फायर केले असून पायावर व पाठीवर गोळी लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
करोडो रुपये अडकल्याची माहिती..
गोळीबार केलेला उद्योजक हा रियल इस्टेटमध्ये कार्यरत असून या उद्योजकाने रिंग रोडमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. तसेच त्याने पैशांची गुंतवणूक करुन मोठा परतावा मिळावा म्हणून अनेकांकडून करोडो रुपये घेतल्याचे बोलले जात आहे. त्याने अनेकवेळा या गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा परतावा दिल्याने त्याच्याकडे करोडोंची गुंतवणूक झाल्याची चर्चा आहे. हा परतावा देण्यामुळे त्याची मनस्थिती बिघडल्याचे बोलले जात आहे. हवेलीतील शेतकरी, अधिकारी व राजकारणी यांची मोठी रक्कम त्याच्याकडे असल्याची माहिती मिळत आहे.