पुणे : घरगुती भांडणातून भावजयीचा गळा दाबून खून करणाऱ्या दिराला अटक केली आहे. लहान मुलीने घटनेअगोदर काय घडले, हे सांगितल्याने खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना मदत झाली. कविता नागराज गडदर (वय २४, रा. साईबाबा कॉलनी, केशवनगर, मुंढवा) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. मल्लिकार्जुन शरणाप्पा गडदर (वय २३, रा. साईबाबा कॉलनी, मुंढवा) असे अटक केलेल्या दिराचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक संजय सिद्धेश्वर माळी यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी घडली. घरातील सात वर्षांच्या मुलीमुळे हा खुनाचा प्रकार समोर आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता नागराज गडदर ही राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली. तिचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात तिचा गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. दरम्यान, सर्व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पार्थिव घेऊन कर्नाटकातील गावी गेले होते. हा खुनाचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्यांना गावाकडून बोलावून घेतले.
मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब निकम यांनी सांगितले की, कविता हिचा पती कामानिमित्त गावी गेला होता. घरामध्ये कविता, तिची मुले आणि दीर हे होते. कविता हिची सात वर्षांची मुलगी घरात होती. मल्लिकार्जुन याने तिला खेळण्यासाठी घराबाहेर जाण्यास सांगितले. ती घराच्या बाहेर गेल्यावर त्याने कविता हिचा गळा दाबून तिचा खून केला. मुलीने आपल्याला घराबाहेर जाण्यास सांगितल्याची माहिती पोलिसांना दिली. मल्लिकार्जुन गडदर याचे घरगुती कारणावरून भांडण झाले होते. तो सेंट्रिंगचे काम करतो. त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. दारू पिण्यासाठी पैसे देण्यावरून त्यांच्यात भांडणे होत होती. या कारणावरून त्याने कविताचा गळा दाबून खून केला.