नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अर्थात ‘एक्स’चा समावेश आहे. पण व्हॉट्सॲपवर एखादा जुना मेसेज सर्च करायचा असेल, तर युजर्सना त्या तारखेपर्यंत स्क्रोल करत जावे लागते किंवा चॅटमध्ये जाऊन तीन डॉटवर क्लिक करून, सर्च हा पर्याय निवडावा लागतो. पण आता जुना मेसेज शोधणे सोपे होणार आहे.
व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी जुने मेसेज लवकर सापडावेत म्हणून फिचर्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही काही सेकंदांत इच्छित मेसेज शोधू शकणार आहात. व्हॉट्सअॅप वेब बीटासाठीही व्हॉट्सअॅप कंपनी नवीन फीचर घेऊन येत आहे; ज्याचे नाव ‘कॅलेंडर फीचर’ असे आहे. हे अँड्राइड ॲपच्या बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध होणार आहे.
एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, युजर्सना चॅटमध्ये सर्च पर्यायांमध्ये काही दिवसांनी छोटेसे एक ‘कॅलेंडर चिन्ह’ दिसेल. त्या चिन्हावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक कॅलेंडर ओपन झालेले दिसून येईल. व्हॉट्सॲप वापरकर्ते आणि विशिष्ट ग्रुपमध्येदेखील हे कॅलेंडर आयकॉन तुम्हाला दिसून येईल; ज्याच्या मदतीने तुम्ही खूप महिने आधीच्या चॅट्स किंवा काही महत्त्वाचे मेसेज सहज शोधू शकणार आहात.