नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार कंपनी अशी ओळख असलेल्या भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल सतत आपल्या नेटवर्कवर काम करत आहे. कंपनी शक्य तितक्या लवकर देशभरात 4G मोबाईल नेटवर्क आणण्यात व्यस्त आहे. आता बीएसएनएलने काही शहरांमध्ये 5G नेटवर्कची चाचणी देखील सुरू केली आहे. यामध्ये जयपूर, लखनौ, चंदीगड या शहरांचा समावेश आहे.
बीएसएनएलचे जूनपर्यंत एक लाख 4G टॉवर्स बसवण्याचे उद्दिष्ट आहे. हे टॉवर्स 5G वर अपग्रेड करता येतील. येत्या काही दिवसांत BSNL च्या 5G सेवेचे रोलआउट सुरू होऊ शकते. असे झाल्यास, सरकारी कंपनी 5G सेवा देणारी चौथी दूरसंचार सेवा कंपनी बनेल. Jio, Airtel आणि Vi ने त्यांचे 5G नेटवर्क लाँच केले आहे. BSNL ने 5G पायाभूत सुविधांची चाचणी सुरू केली आहे. टॉवर साइट्स जयपूर, लखनौ, चंदीगड, भोपाळ, कोलकाता, पाटणा, हैदराबाद, चेन्नई आणि इतर काही राज्यांच्या राजधान्यांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे.
पुढील तीन महिन्यांत 5G सेवा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनी त्या दूरसंचार मंडळांमध्ये 5G ची चाचणी करत आहे, ज्या ठिकाणी कंपनीचे नेटवर्क स्ट्राँग आहे. कानपूर, पुणे आणि विजयवाडा यांसारख्या शहरांमध्येही बेस ट्रान्सिव्हर स्टेशन उभारले जात असल्याचे सांगण्यात येते.