उरुळी कांचन, (पुणे) : ट्रकच्या चाकाखाली आल्याने उरुळी कांचन येथील दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे – सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी परिसरात घडली आहे. बुधवारी (ता. 07) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास भारत पेट्रोल पंपा समोर हा अपघात झाला.
शिवम प्रभाकर धोबे (वय 27, रा. इरिगेशन कॉलनी, उरुळी कांचन ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई संजय कुमार गुराप्पा दाणे यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी चालक शिवम धोबे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून शिवम धोबे हा पुण्याकडून उरुळी कांचनच्या बाजूकडे निघाला होता. सोरतापवाडी येथील भारत पेट्रोल पंपासमोर आले असता त्याच्याजवळ असलेली दुचाकी मोटरसायकल हायगईने अविचाराने रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात निघाला होता.
यावेळी समोर पुढे जाणारे ट्रॅक्टर ट्रॉलीचे मागील कोपऱ्यात शिवमच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. यावेळी त्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या बाजूने निघालेल्या ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली जाऊन जबर मार लागून मयत झाला. याप्रकरणी मोटार सायकल चालकाविरुद्ध गु.र.नं. १४६/२०२४ अन्वये बी.एन.एस. २०२३ मधील कलम २८१, १२५(ब), १०६(१), ३२४(४) व मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल खोमणे करीत आहेत.