गडहिंग्लज : हरळी बु।। (ता. गडहिंग्लज) येथील छाया अशोक पोटे (वय ४८) या महिलेचा शेतामध्ये तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, छाया पोटे या गुरुवारी (दि. २५) सकाळी ११.३० च्या सुमारास मळी नावाच्या शेताकडे भांगलणीसाठी जात होत्या. हे शेत रस्त्यालगत थोड्या अंतरावर होते. त्यामुळे त्यांचे पती अशोक पोटे यांनी दुचाकीवरून छाया पोटे यांना रस्त्यापर्यंत सोडले. तेथून शेताकडे चालत जात असताना वाटेत तुटलेल्या विजेच्या तारेला छाया यांचा स्पर्श झाला. त्या जोरात ओरडल्यामुळे शेजारील शेतातील शेतकरी धावत गेले. तोपर्यंत छाया तीव्र धक्क्याने जमिनीवर कोसळल्या होत्या.
बुधवारी (दि.२४) रात्रीपासून गडहिंग्लज तालुक्यात प्रचंड प्रमाणात पाऊस व सोसाट्याचा वारा असल्याने कदाचित तार तुटून पडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेताकडे जाणाऱ्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.