नाशिक: नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातुन धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील वाखारी शिवारात तरुणास पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी मारहाण करत गळा चिरून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. रवींद्र उर्फ मुन्ना दीपक आहिरे (वय 17 वर्ष, रा. बोधे) असे हत्या केलेल्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. खून झालेल्या रवींद्र अहिरे याचे वडील दीपक आहिरे (वय 42 वर्ष) यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार, मुलीचे नाव घेतल्यामुळे हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. रवींद्र ऊर्फ मुन्ना दीपक आहिरे यास पूर्ववैमनस्यातून आकाश शरद सोनवणे, ऋषिकेश शरद पवार, विनोद शरद पवार, विजय एकनाथ सोनवणे, वींद्र अंकुश गायकवाड (सर्व रा. मोरवाडी साकुरी झाप, ता. मालेगाव) यांनी संगनमत करून ठार मारण्याचा कट रचून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण करून रवींद्र अहिरे याचा गळा धारधार शस्त्राने कापला. त्यानंतर त्याला तिथेच टाकून सर्वजण पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन नांदगाव ग्रामीण रुग्णालयात हलवला. याप्रकरणी चार संशयित हल्लेखोरांना अटक करत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.