संदीप टूले
केडगाव, ता.०९ : दीर्घ प्रतीक्षेनंतर गणपतीमध्ये पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला होता. त्यामुळे पाण्याअभावी जी पिके जळू लागली होती ती कशीबशी आता हिरवळायला सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे. मात्र पिकांना नुसता पाऊस असून फायदा नाही तर त्या पिकांना योग्य वेळी युरिया या खताची खूप गरज असते, युरिया दिल्याने पिके अजूनच बहारदार दिसू लागतात म्हणून सध्या शेतकरी आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर युरिया खते घेण्यासाठी गर्दी करीत असतात. मात्र या संधीचा काही खत विक्रीते गैर फायदा घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. युरिया या खताबरोबर इतर कोणतीही खते किंवा औषधे खरेदी करण्याचा अट्टहास विक्रेते करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहेत.
केवळ युरिया हवा असेल, तर विविध कारणे सांगितली जात आहेत. युरिया खत मिळविणे शेतकऱ्यांसाठी अवघड बनले असून दुकानदाराच्या हातापाया पडण्याची वेळ आली आहे. ठराविक कंपनीचे युरिया खत बाजारात उपलब्ध असून युरियाबरोबर इतर खत घेण्याची अट दुकानदारांकडून घातली जात आहे. प्रत्येकवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर खरीप हंगामात खतांच्या किमती वाढल्या जातात.
दरम्यान, ऐन मोसमात युरिया खताचा डोस पिकांना मिळाला नाही, तर पिकांची वाढ खुंटून उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत असते. पण युरिया तुटवड्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे. आधीच योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच चालू खरीप हंगाम हा एवढाच आशेचा किरण शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून युरिया खताच्या टंचाईबाबत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
युरिया खतासाठी दुकानदार शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. आजच्या घडीला ऊस , जनावरांचा चारा , व इतर तरकारी, पिकांना युरियाची गरज असून, दुकानदार म्हणतात की, एक गोणी इतर कोणत्याही खताची घ्या, नंतरच एक गोणी युरियाची मिळेल. दुकानात युरिया खत शिल्लक असून सुद्धा शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे सरकारने दुकानदारांवर लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.
अजिंक्य काटे (देलवडी, ता.दौंड)