सोलापूर : सोलापूर दक्षिम मतदारसंघात ऐनवेळी कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद टोकाला गेला आहे. प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यातील ठाकरे गट चांगलाच संतापला असून स्थानिक नेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदेंना इशारा दिला आहे. तर संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केलं आहे.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नेहमी कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, युतीमुळे हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आला होता. आता ठाकरे गटाने मतदानानंतर सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.
दक्षिण सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केलेल्या फलकाला जोडो मारो आंदोलन करण्यात आले आहे. शिंदे पिता-पुत्रीने अचानक अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये मतदानानंतर बिघाडी झाली असल्याचे चित्र सोलापूरमध्ये आहे.