लहू चव्हाण
पाचगणी : दानवली (ता. महाबळेश्वर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनीषा अर्जुन दानवले तर उपसरपंचपदी सविता प्रदीप दानवले यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.
दानवली ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्व जागा बिनविरोध निवडून आल्या. आज सरपंच व उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा ग्रामपंचायत कार्यालयात बोलावण्यात आली होती. यामध्ये सरपंचपदासाठी मनीषा अर्जुन दानवले यांचा एकमेव अर्ज व उपसरपंचपदासाठी सविता प्रदीप दानवले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने या निवडी बिनविरोध पार पडल्या.
अध्यासी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाचगणीचे मंडल अधिकारी चंद्रकांत पारवे यांनी काम पाहिले. निवडणूक निरीक्षक म्हणून तालुका कृषी अधिकारी डोईफोडे तसेच प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी आप्पा जाधव यांनी काम पाहिले.
या वेळी नवनिर्वाचित सदस्य मनीषा अर्जुन दानवले, सविता प्रदीप दानवले, मंदा बबन धनावडे, ज्योत्स्ना विकास दानवले, बाबूराव सिताराम दानवले, महादेव आनंदा दानवले, विष्णू धोंडीराम दानवले तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित सरपंच मनीषा दानवले यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले की, सदस्यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी सक्षमपणे पार पाडणार असून, सर्व सहकारी सदस्य आणि ग्रामस्थांना बरोबर घेऊन गावच्या विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचे राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.