सांगली: जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातुन धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत यासाठी तसेच उसनवारीने घेतलेले पैसे परतफेड करणाऱ्याच्या तगाद्याला कंटाळून चक्क आपला मुलगा आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने पतीचाच पत्नीने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी सखोल तपास करत हा खुनाचा प्रकार उघडकीस आणला आहे. बाबूराव दत्तात्रय पाटील असे मयत इसमाचे नाव आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगावच्या हद्दीत मिरज ते पंढरपूर रस्त्यावर १० फेब्रुवारी रोजी शिरढोण येथील बाबुराव दत्तात्रय पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला असल्याचा बनाव रचला होता. त्यानंतर घटनास्थळावरुन मृतदेह तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ येथे आणला होता. त्यानंतर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली होती. मात्र पोलीस तपास करत होते. घर बांधण्यासाठी घेतलेले कर्ज तसेच सावकाराकडून घेतलेले उसने पैसे परत करण्यासाठी मयत इसमाची पत्नी वनिता बाबूराव पाटील व मुलगा तेजस बाबूराव पाटील आणि त्याचा मित्र भिमराव गणपतराव हुलवान यांनी मिळून पत्नी व मुलाने स्वतःच्या बापाचा निर्घृणपणे खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता तिघांनी संगनमताने बाबूराव पाटील यांचा आर्या हॉटेलजवळ रस्त्याच्या दुभाजकावर डोके आपटून खून केल्याचे कबूल केले आहे.
सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद शिवशरण, पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे, पोलीस उपनिरीक्षक भापकर, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील डीबी पथकाचे निवृत्ती करांडे, अभिजीत कासार, नागेश मासाळ, श्रीमंत करे यांच्यासह पथकाने या प्रकरणाचा तपास केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद शिवशरण करीत आहेत.