सोलापूर: कुलदैवताच्या यात्रेवरून सोलापूरला परत येत असताना चालत्या रेल्वेत बाहेरील अज्ञात व्यक्तीने दगड मारल्याने पाच वर्षीय चिमूकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आरोही अजित कांगले असे पाच वर्षीय मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना विजयपूर ते रायचूर पॅसेंजरमध्ये घडली. सोलापुरमधील टिकेकरवाडी स्टेशनजवळ काही अंतरावर ही गंभीर घटना घडल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर स्टेशन येताच तातडीने आरोहीला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी आरोहीला तपासून मृत घोषीत केले.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कुलदैवतेच्या दर्शनानंतर आपल्या पाच वर्षांच्या लेकीला घेऊन रेल्वेतून परत येत असताना टिकेकरवाडी स्टेशनजवळ बाहेरील अनोळखी व्यक्तीने चालत्या रेल्वेवर दगड फेकला. हा दगड पाच वर्षांच्या मुलीच्या डोक्याला लागला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. स्टेशन येताच कुटुंबियांनी तिला तत्काळ सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले.मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोहीला मृत घोषित करताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
दरम्यान चालत्या रेल्वेत दगड नेमका कशामुळे आणि कोणी फेकला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आरोहीच्या कुटुंबियांनी दोषी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेत निष्पाप चिमुकलीचा जीव गेला असून, अशा प्रकारच्या घटनांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.