सातारा : माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील स्वराज्य सेनेचे उमेदवार सत्यवान विजय ओंबासे (रा. वडगाव, ता.माण) यांनी मतदारांवर गैरवाजवी प्रभाव पाडण्यासाठी डिजिटल फ्लेक्सवर ट्रम्पेट या चिन्हाच्या समोर कंसात तुतारी असे लिहून आणि स्पीकरवर ऑडिओ क्लिप प्रसारित केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर संबंधित वाहन व उमेदवारावर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वराज्य सेनेचे उमेदवार ओंबासे यांना निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेट हे अधिकृत चिन्ह मिळाले आहे. मात्र, ते प्रचार करत असताना ट्रम्पेट कंसात तुतारी असा प्रचार करत असल्याचे लक्षात येताच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी ती प्रचाराची गाडी मांडवे हद्दीत पकडली आणि वडूज पोलिस ठाण्यात आणली. त्यानंतर संबंधितांनी निवडणूक आयोगाकडे सदर प्रकाराची तक्रार केली. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात उमेदवारावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी वाहनावरील आक्षेपार्ह साहित्य आणि स्पीकर जप्त केले आहे