सोलापूर : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा राजीनामा दिला. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील असे बोलले जात आहे. दरम्यान यावर महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘अशोक चव्हाण हे भाजपच्या दबाव तंत्रापुढे अतिशय हताश झाले होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.
प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया
प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, “वारंवार प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले. ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. ही काँग्रेससाठी दुर्दैवी गोष्ट आहे. पण हे भाजपचे तंत्र आहे. जिथे प्रेशर आणि ब्लॅकमेल केले जाते, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
अनेक नेत्यांना त्रास देणे सुरूच
‘अशोक चव्हाण यांनी अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. त्यांच्या पत्नी आमदार होत्या. त्यांच्याशी देखील माझे बोलणे झाले. त्यांच्यात असलेले स्ट्रेस लेव्हल आणि ज्या पद्धतीने भाजपकडून माइंड गेम खेळले गेले ते मी रेकॉर्डवर आणू शकत नाही. पण अजूनही काँग्रेसमधील अनेक नेत्यांना भाजपकडून त्रास देणे सुरूच आहे. हे असले राजकारण देशात पहिल्यांदाच होत आहे, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, सुशील कुमार शिंदे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर देखील प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “आमच्या राजीनाम्याबाबतच्या बोलल्या जाणाऱ्या गोष्टी अफवा आहेत. मी आणि साहेबांनी याबाबतीत स्पष्टीकरण दिलेला आहे,” असे प्रणिती शिंदे म्हणाल्यात.
सुशील कुमार शिंदेंची प्रतिक्रिया
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर सुशील कुमार शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. “ही काही पहिलीच वेळ नाही. जे राहिले ते जिद्दीने लढले आणि आमचे त्यावेळेस सरकार आले. यावेळेस देखील असेच काहीसे होईल,” असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले.