नागपूर : ज्या तरुणीवर दोन वर्षांपासून जिवापाड प्रेम होते, त्याच तरुणीशी प्रेमविवाह ठरल्याने युवकाचा आनंद गगनात मावत नव्हता. सात दिवसांवर लग्नाचा मुहूर्त असल्याने घरात जय्यत तयारी सुरू होती. ९ मार्चला तरुणाचा वाढदिवस होता. रात्री तो वधूसोबत जेवायला बाहेर गेला, रात्री उशिरा घरी आल्यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना वाडी परिसरात घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रज्योत उर्फ प्रज्वल मेश्राम असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
प्रज्योत हा आईवडिलांना एकुलता मुलगा होता. त्याचे वडील ऑटो चालवून, तर आई हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. प्रज्योत उच्चशिक्षित असल्याने एका भूखंड खरेदी-विक्री करणाऱ्या कंपनीत सल्लागार म्हणून नोकरी करीत होता. यादरम्यान त्याची एका उच्चशिक्षित तरुणीशी मैत्री झाली. भेटीगाठी वाढत गेल्यामुळे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोन वर्षे प्रेमप्रकरण सुरू होते. प्रज्योतने तिला लग्नाची मागणी घातली. तिने कुटुंबीयांसोबत चर्चा करण्यासाठी वेळ मागितला. काही महिने लोटल्यानंतर पुन्हा प्रज्योतने तिला लग्नाबाबत विचारणा केली. तिने आईवडिलांशी चर्चा केली. मात्र त्यांनी लग्नास विरोध दर्शविताच दोघांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी गेल्या महिन्यात प्रेमविवाह करण्यासाठी नोंदणी केली. १७ मार्चला त्यांचा प्रेमविवाह ठरला होता. प्रज्योतच्या आईने होणाऱ्या सुनेसाठी मंगळसूत्र, अंगठी आणि लग्नाचे कपडे घेतले होते. घरात लग्नाचे वातावरण आणि खरेदी सुरू होती. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते.
९ मार्चला प्रज्योतचा वाढदिवस होता. शनिवारी सायंकाळी तो कामावरून घरी आला. तेवढ्यात त्याला तिचा फोन आला. घाईघाईने त्याने तयारी केली अन् भेटायला निघून गेला. दोघेही एका हॉटेलमध्ये गेले. दोघांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. नंतर तो रात्री उशिरा घरी आला. खोलीत जाऊन झोपला. रविवारी पहाटे जेव्हा आई मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झोपेतून उठली. त्याच्या खोलीत गेली, तेव्हा मुलगा गळफास लावलेल्या स्थितीत बघताच तिने हंबरडा फोडला. पती व मुलगी धावतच प्रज्योतच्या खोलीत आले. दोघेही जोरात रडू लागले. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. वाडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अकस्मिक मृत्यूची नोंद केली. प्रज्योतच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट नसल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे यांनी दिली.