यवतमाळ: यवतमाळ मधून काळीज पिळवून टाकणारी घटना घडली आहे. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं समजताच पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यात त्यांचे निधन झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातल्या वागद ( इजारा) येथे घडली आहे. प्रल्हाद खंदारे असे मृत्यझालेल्या वडिलांचे नाव आहे. नुकत्याच यूपीएससीच्या निकालात मोहिनी प्रल्हाद खंदारे यांनी यश मिळवले होते. मात्र वडिलांच्या निधनाने संपूर्ण खंदारे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे .
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत मोहिनी प्रल्हाद खंदारे हिने 884 वे स्थान प्राप्त केले. आपली मुलगी प्रशासकीय अधिकारी होणार या बातमीने वडिलांना आनंद झाला. त्यामुळे आनंद उत्सव साजरा करण्यासाठी गावकऱ्यांना पेढे वाटायला सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांना पेढे वाटतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने यात त्यांचा मृत्यू झाला. एकीकडे मुलीच्या यशाचा दिवस तर दुसरीकडे वडिलांच्या मृत्यूने काही क्षणात कुटुंबावर शोककळा पसरली आहे.