अकोला : उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बोचरा वार केला. खासदार शरद पवार आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अकोल्यातील सहकार मेळाव्याला हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यास आम्ही सकारात्मक आहोत. याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं देखील शरद पवार यांनी सांगितलं.
या पत्रकार परिषदेत जर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांना हार घालेन असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, “हे फक्त स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही”.
यावेळी मंत्री छगन भुजबळांच्या दाव्याविषयी त्यांना विचारणा केली असता पवार यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. “काही लोकांचा यासाठी आग्रह होता हे खरं आहे . खासदार सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करावं हा प्रस्ताव छगन भुजबळ यांनीच दिला होता. पण, तो स्वीकारला नाही. तो स्वीकारण्याचे कारणही नव्हते. कारण त्यानंतर पुढचं जे पाऊल होतं, ते आम्हाला कोणालाही मंजूर नव्हतं”, असं शरद पवार म्हणाले. सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करून त्यानंतर भाजपासोबत जायचं, असं नियोजन ठरल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शरद पवार बोलत होते.