अमरावती : राज्यात महिलांवरील अत्याचार तसेच विनयभंगाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सरकारकडून कडक कारवाईसाठी पाऊले उचलली जात आहे. त्यात कोलकाता आणि बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असताना आता अमरावतीत देखील एक अशीच घटना उघडकीस आली आहे. अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा गावात सरपंच पुत्राकडून अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बसची वाट पाहत असलेल्या एका 15 वर्षीय विद्यार्थिनीला सरपंचाच्या मुलाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवले. त्यानंतर दुचाकी जंगलाच्या दिशेने घेऊन गेले. तिथे झालेल्या अंधाराचा फायदा घेत त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना शनिवारी रात्री घडली आहे.
याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या नराधमाला अटक केली. मात्र या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे.