भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अचानकपणे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ते भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार प्रफुल पटेल यांनी या भेटीबाबत म्हटले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही मार्ग काढण्यासाठी देखील दिल्ली दौऱ्यावर गेले असू शकतात. तसेच काही राजकीय चर्चा, तीन पक्षांशी संबंधित काही गोष्टींवरील निर्णय अजूनही प्रलंबित आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारही अजून रखडला आहे. अशा काही बाबतीत चर्चा करण्यासाठी दोघे दिल्लीला गेले असावेत, असे खासदार पटेल यांनी म्हटले.
पुढे बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही. उलट सर्व पक्ष, सत्ताधारी व विरोधक म्हणतात की, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं. हे आरक्षण मुंबई हायकोर्टात टिकले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर हे आरक्षण रद्द करण्यात आले. मराठा आरक्षणाबाबत मार्ग कसा काढायचा, ही महत्त्वाची बाब आहे. मराठा समाजाला आरक्षण लगेच देता येईल, पण मुद्दा हा आहे, आरक्षण न्यायपालिकेत टिकले नाही तर, परत कोणत्या समाजाची फसवणूक होता कामा नये. ही महत्वाची बाब असल्याचेही प्रफुल पटेल यांनी म्हटले.