अमरावती: आमरवातीमध्ये घरगुती वादातून पतीने आपल्या गर्भवती पत्नीच्या पोटात आणि पाठीवर धारदार चाकूने वर केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीला अटक केली आहे. पूजा राहुल ताबोरे (वय 30 वर्ष ) असे जखमी गर्भवती महिलेचे नाव आहे. अमरावती जिल्ह्यातील बोडना फाटा, फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती आणि पत्नी महिला यांच्यामध्ये घरगुती कारणावरून नेहमी वाद होत होता. काही दिवसांपूर्वीच दोघांचेही घरगुती वादातून कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर भांडणाचे रूपांतर मारहाणीत झाले. याच भांडणातून रागात येऊन पतीने पत्नीच्या पोटात आणि पाठीवर चाकूने वार केले.
या घटनेबाबत अमरावती शहर पोलिसांना कळताच तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यानंतर महिलेला जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास करीत आरोपी पतीला अटक केली असून, पुढील चौकशी सुरू आहे.