नागपूर : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे आश्वासन देणाऱ्या दाम्पत्याने अन्य दोघांच्या मदतीने एका बापलेकीची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. परिमल चंद्रशेखर कोटपल्लीवार, रूपाली कोटपल्लीवार (रा. नंदनवन), मिलिंद रमेश धवड (रा. कोतवाली) आणि नितीन भगवान बल्लमवार (रा. विद्यानगर) अशी आरोपींची नावे आहेत. भास्कर गुलाबराव चाफले (४९, रा. नंदनवन) यांच्या मुलीला एमबीबीएसमध्ये प्रवेश हवा होता. यासंदर्भात एक जाहिरात बघून ते टेलिफोन एक्स्चेंज चौकातील थावलानी बिल्डिंग येथील आर. के. एज्युकेशन कौन्सिलिंगमधील परिमल कोटपल्लीवार यांच्या संपर्कात आले.
परिमलने चाफले यांना चांगल्या मेडिकल कॉलेजात मुलीच्या प्रवेशाचे आमिष दाखवत २५ लाख रुपये लागतील, असे सांगितले. चाफले त्यासाठी तयार झाले. यानंतर आरोपी परिमलने त्याची पत्नी रूपाली, सहकारी मिलिंद धवड आणि नितीन बल्लमवार यांना हाताशी घेतले. चाफलेंकडून २५ लाखांची रक्कम घेतली. परंतु, मुलीचा कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला नाही. उलट घेतलेली रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी चाफले यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.