नागपूर : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसला जोरदार धक्का देण्याची शक्यता आहे. विदर्भातील काँग्रेसचा मोठा बहुजन चेहरा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत लवकरच प्रवेश करेल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच हा धक्का दिला जाईल, असा अंदाज आहे.
विदर्भाने भरभरून मतांचे दान महायुतीच्या झोळीत टाकले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा भक्कम बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. निवडणुकीतील पक्षाच्या पराजयाने अधिक हवालदिल झालेल्या या नेत्याला किमान काँग्रेसच्या संघटना बांधणीमध्ये राज्यव्यापी मुख्यपद मिळेल, अशी आशा होती. हा मनसुबाही नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीमुळे धुळीस मिळाला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची मानसिक तयारी या नेत्याने केल्याचे कळते. राष्ट्रवादीच्या कोट्यातून आपणास विधानपरिषदेमध्ये ‘विजयी’ करू, असा विश्वास या नेत्याला देण्यात आला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीच्या कोट्यातून प्रतिनिधित्व देण्याचा शब्द दिला गेल्याचे कळते.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुरुवातीला या नेत्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला होता. परंतु, अजितदादांच्या यशस्वी शिष्टाईमुळे त्यांचे मन वळविण्यास यश मिळाल्याचे समजते.