पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 2 शिक्षक आणि 2 पदवीधर या जागेसाठी मतदारसंघातील निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. निवडणूक आयोगाने 8 मे रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील एकूण 4 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.
यात महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. या चार जागांसाठी 10 जूनला मतदान होणार होते तर 13 जून ला मतमोजणी केली जाणार होती. परंतु शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.
निवडणूक आयोगाने या संदर्भात विचारविमर्श करुन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उक्त व्दैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नंतरच्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक ही जाहीर करण्यात आले आहे.