मुंबई : एसटी महामंडळाची आर्थिक कोंडी सुरू असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असताना आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पगारासंदर्भात आनंदाची बातमी दिली आहे.एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेला होईल,याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. पण गेल्या अनेक महिन्यापासून मागणीप्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना नक्त वेतन देण्यात येत असून या महिन्यात पुन्हा नक्त वेतन देण्याइतका सुद्धा निधी सरकार कडून आलेला नाही.त्यातच एसटी बँकेला ४० कोटी रुपये इतकी रक्कम द्यावी लागल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या सात तारखेच्या आत जमा होईल, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी निश्चित रहावे असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान याबाबत बोलताना ते म्हणाले, आजच्या आज 120 कोटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होतील. तसेच कर्मचाऱ्यांना मंगळवारी पगाराची रक्कम मिळेल. 176 कोटींची मागणी केली होती त्यातील 120 कोटी रक्कम आज मिळेल. वारंवार मागणी करावी लागू नये म्हणून सात तारखेच्या आज सर्व पगार जमा होईल असं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसेच काही तांत्रिक त्रुटी असतात, उर्वरित रक्कम तीन टप्प्यात देण्याचे वित्त विभागाने मान्य केले आहे त्यामुळे पुढच्या महिन्यापासून सात तारखेच्या आत पगार बँक खात्यात पोहचेल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.