नाशिक : नातेवाईक असलेल्या ५७ वर्षीय व्यावसायिकाने सेल्फी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संशयिताने पतीस दम दिल्याने महिलेने पोलिसांत धाव घेतली असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका असलेली पीडिता व व्यावसायिक संशयित एकमेकांचे नातेवाईक आहेत. संशयिताकडून गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून महिलेचा पाठलाग सुरू असून, अनेक वेळा महिला शाळेत कामावर जात असताना तिची वाट अडवत, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने संशयिताने तिला आपल्या वाहनात बसविले होते. यावेळी चेष्टामस्करी करीत. त्याने तिच्या सोबत सेल्फी काढले होते. यावेळी त्याने विवाहाची मागणी घालत महिलेचा विनयभंग केला. कालांतराने त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेच्या पतीस दमदाटी केल्याने पीडितेने पोलिसांत धाव घेतली असून, सहायक निरीक्षक सपकाळे तपास करीत आहेत.