जळगाव : चोरटे कधी आणि कुठे चोरी करतील याचा काही नेम नाही. कधी मंदिर तर कधी थेट सीसीटीव्ही असलेल्या एटीएममधून चोरी इथपर्यंत चोरट्यांचे धाडस आहे. असे असतानाच आता जळगाव शहरातील जिल्हा न्यायालयाच्या गेटसमोरूनच एकाची दुचाकी चोरीला गेली. हा प्रकार समोर आल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे.
विश्वासराव धर्मराज पाटील (वय 40, रा. श्रीधर नगर, जळगाव) असे दुचाकी चोरीला गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विश्वासराव हे जिल्हा परिषदेत नोकरीला आहेत. एका कामानिमित्त ते जळगाव शहरातील जिल्हा न्यायालयाच्या गेट नंबर-2 जवळ आलेले होते. त्याठिकाणी दुचाकी पार्क करून कामानिमित्त निघून गेले. नंतर ते पार्किंग ठिकाणी आले असता त्यांना त्यांची दुचाकी दिसली नाही.
न्यायालयाच्या गेटसमोर पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही बाब विश्वासराव पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्यांना दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.