जळगाव, ता. 29 : जळगाव येथील दुर्गेष इम्पेक्स कंपनीच्या 1 कोटी 60 लाख रुपये दरोडा प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर करण्याचे आदेश जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांनी पारित केले आहेत. अशी माहिती आरोपीचे वकील अॅड नितीन भालेराव यांनी दिली. टिल्लूसिंघ राजुसिंघ टाक (रा. ठाणे) असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारीला जळगाव येथील दुर्गेश इम्पेक्स या कंपनीचे 3 कर्मचारी कंपनीच्या कामाकरिता बँकेतून 1 कोटी 60 लाख रुपये रक्कम कंपनीच्या क्रेटा कार मधून घेऊन येत होते. यावेळी अज्ञात आरोपींनी चालत्या कारला धडक मारून व नंतर गाडीच्या काचा फोडून कंपनीच्या कर्मचार्यांना मारहाण करून गाडीतील 1 कोटी 60 लाखाची रक्कम पळवली होती. त्यानंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात 5 आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान धरणगाव पोलिसांनी आरोपी टिल्लू सिंघ याला सुरत, गुजरात येथून अटक केली होती. आरोपी कारागृहात असताना आरोपीने अॅड नितीन भालेराव यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात जामिन अर्ज दाखल केला होता. आरोपीने कुठलाही गुन्हा केलेला नसून आरोपीकडून गुन्ह्याच्या संदर्भातील तपासात काहींही हस्तगत झाले नाही. तसेच पोलिसांनी दरोडा पडलेले पैसे दुर्गेश इम्पेक्स या कंपनीच्या मालकीचे आहेत हे दाखवण्यासाठी कुठलाही पुरावा सादर केला नसून आरोपीच्या ओळखीबाबत पोलिसांनी तपास केलेला नाही. असा युक्तिवाद करण्यात आला.
दरम्यान, सरकारी वकील व आरोपी पक्षाचा पुरावा ऐकून जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश शरद पवार यांच्या कोर्टाने आरोपीस अटी व शर्थीवर जामीन देण्याचे आदेश पारित केले. या कामी अॅड. मयूर चौधरी व अॅड. जाफर शेख यांनी मदत केली.