मुंबई : मेट्रो तिकीटांसाठी प्रवाशांचा रांगेत उभा राहून वेळ वाया जावू नये यासाठी महामुंबई मेट्रोने महत्त्वाचा निर्णय घेतला. प्रवाशांना डिजिटल तिकीट सेवा उपलब्ध करून दिली. या सेवेचा फायदा घेत मुंबईकरांनी मेट्रोला अधिक पसंती दिली आहे. अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो 2 अ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7 मार्गिकेवर एका दिवसात तब्बल 51 हजार 991 प्रवाशांनी व्हॉट्सअॅपद्वारे तिकीट काढून प्रवास केला आहे.
देशभरातील सर्व मेट्रो मार्गिकांमध्ये व्हॉट्सअॅपद्वारे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार करता ही संख्या सर्वाधिक आहे. डिजिटल तिकीटाद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून पेपर तिकीटांचा वापर घटला आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळत आहे.महामुंबईने दिलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर हाय असा इंग्रजीतील संदेश पाठवून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट खरेदी करता येते. यातून कागदी तिकिटांची गरज राहणार नसून, पर्यावरणपूरक प्रवासास प्रोत्साहन मिळत आहे.
दरम्यान डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून पेमेंटसाठी सुविधा शुल्क लागेल. परंतु, युपीआय आधारित व्यवहारांसाठी अतिरिक्त शुल्क नसणार आहे.त्यामुळे सध्या जवळपास 19 टक्के प्रवासी हे व्हाट्सअपच्या माध्यमातून तिकीट काढत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे .