पिशोर : पिशोर (ता. कन्नड) येथील शफेपुर भागातील एका तरुणाने आजारी आईच्या इलाजावर झालेल्या खर्चाच्या व आईच्या निधनाच्या नैराश्यातून गळफास घेऊन मंगळवारी (दि.१३) सकाळी आत्महत्या केली. गोरख पांडुरंग मोकासे (वय ३१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
येथील शफेपुर भागातील तरुण गोरखची आई अल्पभूधारक शेतकरी होती. त्याचे वडील ३ वर्षांपूर्वी मयत झालेले आहेत. एक आई आणि गोरख मिळून दोन भाऊ असे चार जणांचे कुटुंब. त्यातही मागील अनेक दिवसापासून त्याची आई आजारी होती. आजारी आईच्या उपचारासाठी त्याने अनेकांकडून हात उसनवारीने पैसे घेतले होते. त्यातच त्याच्या आईचे चार दिवसांपूर्वीच निधन झाले. प्रचंड ओढाताण करून आईचा उपचार करत असताना आईचे निधन झाले. त्यामुळे उधारी व उसनवारी कसे फेडायची या विवंचनेतून त्याने मंगळवारी सकाळी स्वतःच्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
गोरखने गळफास घेतल्याचे त्याच्या भावाच्या लक्षात येताच त्याने इतर नातेवाईक व शेजारी यांना जमा केले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर सकाळी अकरा वाजता त्याच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात दोन लहान भाऊ आहेत.