हिंगोली : डिग्रस वाणी गावातील दुचाकी अपघाताचं धक्कादायक सत्य पोलिसांनी समोर आणले आहे. दृश्यम आणि क्राईम पेट्रोल सिरीयल बघून मुलानेच आई वडील आणि भावाचा खून करून अपघात झाल्याचा बनाव रचल्याच पोलिसांनी सांगितले आहे. कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि मुलगा आकाश जाधव अशी मृतांची नावे होती. मयत जोडप्याच्या दुसऱ्या मुलानेच म्हणजे महेंद्र जाधव याने आई-वडिल आणि भावाची हत्या पैसे देत नसल्याच्या रागातून केली होती.
महेंद्रविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील डीग्रसवाणी या गावलागत 11 जानेवारीला वळणालगत एक अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि आकाश जाधव यांचा मृत्यू झाला होता. ही माहिती महेंद्र जाधवने स्वतः पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. परंतू अपघातस्थळी अपघात नसून अपघाताचा बनाव केला जात असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यावरून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यात पोलिसांना तपासात सत्य समजले.
हत्येची थरारक घटना
आई-वडील पैसे देत नाहीत. नातेवाईकामध्ये सतत बदनामी करतात. हा राग मनात धरून 9 जानेवारी रोजी रात्री आकाश जाधवला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याला विजेचा शॉक दिला तरीही आकाश जाधव जिवंत राहिला. त्यानंतर महेंद्रने त्याच्या डोक्यात रोड घालून खून केला.त्याची डेडबॉडी नाल्यामध्ये टाकली. 10 जानेवारीला दुपारी त्याची आई कलावती जाधवला सुद्धा झोपेच्या गोळ्या दिल्या. शेतामध्ये नेत डोक्यामध्ये रॉडने वार करत तिचा सुद्धा खून केला. बॉडी रोडलगत नेऊन टाकली. त्यानंतर मध्यरात्री वडील कुंडलिक जाधव यांना सुद्धा झोपेच्या गोळ्या दिल्या आणि डोक्यामध्ये रोडचा वार करत खून केला. मृतदेह नाल्यात आई आणि भावाच्या मृतदेहाजवळ ठेवून दिला आणि त्या ठिकाणी अपघात केल्याचा बनाव केला.