छत्रपती संभाजीनगर : मुंबई ते जालना वंदे भारत एक्सप्रेस १४ दिवसांपूर्वी सुरू झाली. त्यातच आता वंदे भारत एक्सप्रेसचा पहिला अपघात झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेस बैलाला धडकून अपघात झाला. या धडकेत तब्बल एक हजार फुटापर्यंत एक्सप्रेसने बैलाला फरपटत नेले. यात बैलाचे अक्षरशः शरीराचे तुकडे झाले. यामुळे आत असलेल्या ३५० प्रवाशांना एक तास एकाच जागी थांबावे लागले. ही घटना शनिवारी सायंकाळी पोटुळ शिवारात घडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात वंदे भारत एक्सप्रेस उद्घाटन थाटात पार पडले. लांब पल्ल्याचं अंतर कमी वेळेत पूर्ण होण्यासाठी या वंदे भारत एक्सप्रेसचं वैशिष्ट्य आहे. यामुळे प्रवाशांना याचा फायदा होतो. दरम्यान, मुंबई ते जालना दरम्यान ३० डिसेंबर रोजी वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आली.
वेगात असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा अचानक अपघात झाल्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये असलेले ३५९ प्रवासी घाबरून गेले होते. अपघात झाल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस एक तास रेल्वे थांबली होती. छत्रपती संभाजीनगर विभागाकडे इलेक्ट्रिक राखीव इंजिन असल्यामुळे रात्री उशीरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे मनमाडकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी दुसरी रेल्वे लासूर स्टेशन स्थानकावर रोखण्यात आली.