मुंबई : गेल्या सात दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. मराठा आंदोलकांच्या आग्रहामुळे जरांगे आजपासून पाणी पिणार आहेत. मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. उग्र आंदोलन होत असल्याने आंदोलकांच्या आग्रहाने जरांगे पाटील पाणी घेणार आहेत. पाणी घेत नसल्याने तब्येत खालावत असल्याने आंदोलक हिंसक होत असल्याने मनोज जरांगे यांनी हा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतरही राज्यातील काही भागात हिंसक आंदोलन सुरूच आहे. बीडमध्ये सोमवारी झालेल्या आंदोलनानंतर जमावाने बीड बस स्थानकातील बसेसची तोडफोड केली. सोमवारी जमावाने बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्याला आग लावल्यानंतर हा जमाव बस स्टॅन्डमध्ये आला. यावेळी बस स्टँडमध्ये 70 पेक्षा जास्त एसटी उभ्या होत्या. या सर्व एसटी जमावाने फोडल्या. सत्ताधारी जाळपोळ करत असल्याचा जरांगेंना संशय आहे. त्यामुळे सध्याच्या हिंसक आंदोलनात मराठा समाजातील बांधवाचा बळी जाऊ नये, यासाठी देखील जरांगेंनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे.