जालना : जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पोटच्या लेकानेच आपल्या वडिलांची डोक्यात लाकडी दाड्यांने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. राहते घर विकण्यास वडिलांनी विरोध केल्याच्या किरकोळ कारणावरून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इब्राहीम खान मुबारक खान (वय 60 वर्ष, रा. अक्सा मशीद परिसर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर, शाहरुख इब्राहीम खान (वय 30 वर्ष) असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, रिक्षाचालक असलेला शाहरुख इब्राहीम खान हा वडील इब्राहीम खान यांना राहते घर विकण्यास सांगत होता. मात्र, वडिलांचा यास विरोध होता. यातून बाप-लेकांमध्ये नेहमी वाद व्हायचे. आज दुपारी याच कारणावरून झालेल्या वादातून शाहरुख खान याने वडील इब्राहीम खान यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने जबर मारहाण करून खून केला.
जालना शहरातील गांधीनगर भागात सोमवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला आहे. इब्राहीम खान मुबारक खान असे मृताचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी मुलगा शाहरुख इब्राहीम खान यास ताब्यात घेतले आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, सदर बाजार ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रशांत महाजन, उपनिरीक्षक नरोडे, महिला कर्मचारी फुलके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.