छत्रपती संभाजीनगर : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणारे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच याच बदलापूरमधून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून बदलापूरची १५ वर्षांची मुलगी घर सोडून बाहेर पडली आणि ती थेट संभाजीनगरमध्ये जाऊन पोहचली. ती रात्रभर रेल्वे स्टेशनवर राहिल्यानंतर सकाळी या मुलीला दामिनी पथकाने ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी की, बदलापूर येथील १५ वर्षीय मुलगी रेल्वेने शुक्रवारी रात्री २ वाजता रेल्वे स्थानकावर उतरली. ती रेस्ट रूममध्ये थांबली. शनिवार सायंकाळी स्थानकाबाहेर पडली. तोपर्यंत तिच्या आईने बदलापूर पोलिसांकडे धाव घेतली होती. मुलीने मोबाइल सुरू करताच बदलापूर पोलिसांच्या तांत्रिक तपासात ती महावीर चौक परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. बदलापूर पोलिसांकडून दामिनी पथकाला तिची माहिती देण्यात आली. यानंतर दामिनी पथकाने लगेच धाव घेत तिला सुखरूप ताब्यात घेतले. दामिनी पथकातील अंमलदार निर्मला निभोरे, रुपाली शिंदे यांनी बाबा चौकात धाव घेत तिची विचारपूस करत तिला ताब्यात घेतले आहे.
‘त्या’ शाळेचीच ती विद्यार्थिनी आहे..
बदलापूर अत्याचार प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या ‘त्या’ शाळेचीच ती विद्यार्थिनी असून त्या शाळेतून तिने नुकतीच दहावी उत्तीर्ण केली आहे. १५ वर्षीय मुलीच्या आईने दुसरे लग्न केले. सावत्र वडील तिला त्रास देत होते. यामुळे कंटाळून ती गुरुवारी रात्री मोबाइल बंद करून घर सोडून निघून आली. दामिनी पथकाच्या निंभोरे यांनी तिला स्वतःची ओळख दिली. विश्वासात घेतल्यानंतर तिने सर्व प्रकार कथन केला. महिला पोलिसांनी कुटुंबाला संपर्क केल्यानंतर तिची आई रात्री इकडे निघाली. तिच्या जेवण, राहण्याची व्यवस्था पोलिस करत असल्याचे बघून मुलीला अश्रू अनावर झाले होते.