नांदेड : राज्यातील विधानसभा निवडणुकीने चांगलाच रंग पकडला आहे. प्रचारही जोरदार सुरु आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवारांकडून प्रचारसभा घेण्यात येत आहेत. अशातच काही उमेदवार आणि राजकीय नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये सुद्धा समोर येऊ लागली आहेत. आता नांदेडमधील भाजप उमेदवाराचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. नांदेडमध्ये भाजप नेत्या, आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजप किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी वादग्रक्त वक्तव्य केलं आहे.
किनवट मतदारसंघाचे भाजप उमेदवार केराम यांच्या वक्तव्याने नव्या वादाला सुरवात होण्याची शक्यता आहे. भाजप उमेदवार भीमराव केराम यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची किनवटच्या बोधडी येथे सभा आयोजित केली होती. त्यावेळी केलेल्या आमदार केराम यांच्या वक्तव्याची मोठी चर्चा सुरु झाली आहे.
नेमकं काय म्हणाले भीमराव केराम?
‘रोज रोज गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे का? असे बेताल वक्तव्य भाजपचे नांदेड जिल्ह्यातील किनवटचे उमेदवार भीमराव केराम यांनी केलं आहे. यावेळी भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे व्यासपीठावर उपस्थित होत्या. तेव्हा आमदार भीमराव केराम यांनी हे बेताल वक्तव्य केलं आहे. भीमराव केराम गावात फिरत नाहीत, असा आरोप त्यांच्यावर होत असताना केराम यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे आता वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.