जालना: शिवसेनेचे जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांना समाजमाध्यमावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात अभिमन्यू खोतकर यांनी जालना तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंस्टाग्राम अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली आहे. 4 वेगवेगळ्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अर्जुन खोतकर आणि त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांच्याविरुद्ध अश्लील शिवीगाळ करत, त्यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेमुळे जालन्यात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. संबंधित कृत्य करणाऱ्या इंस्टाग्राम अकाउंटची सखोल चौकशी पोलिस करत आहेत.