कल्याण : कल्याण जवळील आंबिवली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका दुकानदाराने अकरा वर्षीय मुलीला दुकानात बोलवून दुकानात डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश म्हात्रे असे लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम आरोपीस अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण जवळील आंबिवली परिसरात 11 वर्षीय पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबासह राहते. पीडितेचे आई-वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. 5 मे रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पीडित अल्पवयीने मुलगी मैत्रिणीच्या घरी जाते असे सांगून घराच्या बाहेर पडली. मात्र ती सायंकाळी घरी परतली नाही. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात तिला शोधायला सुरूवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी अल्पवयीन पीडित मुलगी त्याच परिसरात आढळली. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन तिच्या कुटुंबीयांनी विचारले. तेंव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला.
अधिक माहिती अशी की, आंबिवली नदीकाठी सुरू असलेली शूटिंग पाहण्यासाठी ही अल्पवयीन मुलगी त्या ठिकाणी गेली होती. या नदीकाठच्या परिसरातच नराधम गणेश म्हात्रेचे किराणामालाचे दुकान आहे. तेथे नराधम गणेशची नजर या अल्पवयीन मुलीवर पडली. त्यानंतर त्याने मुलीला दुकानात बोलवले. त्यानंतर तिला जबरदस्तीने दुकानात थांबवले. त्यावेळी पीडित अल्पवयीन मुलीने विरोध केला. तेंव्हा दुकानात ओढून त्याने दुकानाचे शटर बंद केले. त्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार केला.
याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीनुसार खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम गणेश म्हात्रे याला अटक केली आहे.