कल्याण: कल्याणमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाच जणांनी घरात घुसून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करायला गेलेल्या एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. सानिया बागवान असे मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
कल्याणच्या पश्चि मेतील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद वास्तव्यास आहेत. याच परिसरात राहणाऱ्या गुलाम शेख नावाच्या व्यक्तीने निसार सय्यद यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तेंव्हा निसार सय्यद यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून गुलाब शेख आणि निसार सय्यद यांच्यामध्ये वाद झाला.
वादानंतर निसार सय्यद घरी निघून गेले. ते कुटुंबासह घरात जेवण करत असतानाच गुलाम शेख याचा मुलगा अब्दुल घरात आला. तेथे येऊन त्यांनी निसार यांना वडिलांसोबत वाद का घातला याची विचारणा केली. त्यानंतर अब्दुलने निसार सय्यद यांना लाकडी दांडक्याने मारायला सुरुवात केली. तेंव्हा मारहाणीदरम्यान निसार यांची मुलगी सानिया बागवान मध्यस्थी करायला आली.
मध्यस्थी करत असताना गुलाम शेख अब्दुल यांने आणि परिसरात राहणाऱ्या शोएब शेख, अजित शेख, आणि शाहिद शेख यांनी वडील आणि मुलीला मारहाण केली. या मारहाणीत सानिया बागवान हिचा मृत्यू झाला. तर निसार सय्यद हे गंभीर जखमी झाले.
दरम्यान, घडलेल्या घटनेची माहिती मिळताच, महात्मा फुले पोलीस घटनास्थळी पोहचले. या प्रकरणात महात्मा फुले पोलिसांनी सानिया बागवान हिची हत्या करणाऱ्या पाचही आरोपींना अटक केली आहे.
पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.