मुंबई : विरारमध्ये सात महिन्याचं बाळ २१ व्या मजल्यावरुन खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईच्या कडेवरुन हे बाळ खाली पडल्यांची माहिती आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,विकी सदाने आणि त्यांची पत्नी पूजा सदाने या दाम्पत्याचं सात महिन्याचं बाळ 21 मजल्यावरून खाली पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली. हे दाम्पत्य विरार येथे बोळींज परिसरातील जॉय विले नावाच्या निवासी संकुलात वास्तव्यास आहे. या निवासी संकुलातील एकविसाव्या मजल्यावर हे दाम्पत्य राहत असून सदाने दाम्पत्य सात महिन्यांपूर्वी आई-बाबा झाले होते. या दाम्पत्याला लग्नाच्या सात वर्षांनी बाळ झालं होतं, त्यामुळे हे बाळ त्यांच्यासाठी खूप खास होतं. व्रिशांक असं त्या बाळाचं नाव होतं.
खिडकी बंद करत असताना पूजा सदाने यांचा तोल गेला आणि कडीवरील सात महिन्याचं बाळ एकविसाव्या मजल्यावरून खाली पडलं. यात त्या सात महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान व्रिशांकला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. इमारतीच्या एकवीसाव्या मजल्यावरुन पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.