लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या पुरस्कार सोहळ्याला आपले सीईओ आणि या स्पर्धेचे संचालक सुमैर अहमद सय्यद यांना आमंत्रित न केल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डा (पीसीबी) ने नाराजी व्यक्त केली असून याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) निषेध नोंदवण्याची तयारी केली आहे.
दुबई येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यानंतर स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. या समारंभात बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी भारतीय खेळाडूंना पांढरे कोट आणि सामना अधिकाऱ्यांना पदके प्रदान केली. आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी कर्णधार रोहित शर्माला ट्रॉफी दिली आणि विजेत्यांना पदके दिली. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया आणि न्यूझीलंड क्रिकेटचे सीईओ रॉजर टॉसी हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
मात्र, यामध्ये पीसीबीचा प्रतिनिधी नसल्याने चर्चा सुरू झाली आहे. आयसीसीने यावर स्पष्टीकरण देत, पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नंक्वी यांना स्टेजवर येण्याची व्यवस्था करण्यात आली होती, परंतु ते अंतिम फेरीच्या सामन्यालाच न आल्याने यामध्ये बदल करण्यात आला, असे म्हटले आहे. पीसीबी मात्र या स्पष्टीकरणावर समाधानी नसून त्यांनी निषेध नोंदवण्याचा पवित्रा घेतला आहे.