पुणे: टीम इंडियाची विश्वचषकातील विजयी घोडदौड सुरूच आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्ताननंतर आता भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव केला आहे. टीम इंडियाने सलग चौथा विजय नोंदवला. आता भारताचे 4 सामन्यांत 8 गुण झाले आहेत. मात्र, भारतीय संघ अजूनही गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड अव्वल स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडचेही 4 सामन्यात 8 गुण आहेत, मात्र टीम भारतापेक्षा चांगल्या नेट रनरेटमुळे किवी संघ अव्वल स्थानावर आहे.
रोहित शर्माकडून झंझावाती सुरुवात
भारतीय गोलंदाजांनंतर फलंदाजांनी आपली ताकद दाखवून दिली. टीम इंडियासमोर 257 धावांचे लक्ष्य होते. भारताने 41.3 षटकांत 3 बाद 261 धावा करत सामना जिंकला. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा 40 चेंडूत 48 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शुभमन गिलने पन्नास धावांचा टप्पा पार केला. शुभमन गिल ५५ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहलीने उर्वरित काम पूर्ण केले. विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. तो ९7 चेंडूत 103 धावा करून नाबाद परतला. श्रेयस अय्यर अवघ्या 19 धावा करून बाद झाला. विराट कोहलीने बांगलादेशी गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. याशिवाय केएल राहुल 34 चेंडूत 34 धावा करून नाबाद राहिला.
विराट कोहलीने शतक झळकावले
विराट कोहलीने 97 चेंडूत 103 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याचबरोबर विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील हे ४८ वे शतक आहे. बांगलादेशकडून मेहंदी हसन मिराज हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मेहंदी हसन मिराजने २ बळी घेतले. त्याने शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरला बाद केले. याशिवाय हसन महमूदला 1 यश मिळाले. हसन महमूदने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बाद केले.
तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशने 50 षटकांत 8 गडी गमावून 256 धावा केल्या. वास्तविक बांगलादेशचे सलामीवीर तनजीद हसन आणि लिटन दास यांनी शानदार सुरुवात केली. दोन्ही सलामीवीरांनी 14.4 षटकात 93 धावा जोडल्या. एकेकाळी बांगलादेशी संघ 300 धावांचा टप्पा ओलांडेल असे वाटत होते, मात्र यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगलेच कमबॅक केले. विशेषत: जसप्रीत बुमराहसमोर बांगलादेशी फलंदाज हतबल दिसत होते. जसप्रीत बुमराहने 10 षटकांत 41 धावांत 2 खेळाडू बाद केले.