माउंट मौनगानुई : सूर्यकुमार यादवच्या आक्रमक फलंदाजीने सैरभैर झालेल्या न्युझीलंड संघाला दीपक हुडाच्या ड्रीम स्पेल समोर शरणागती पत्करावी लागली. भारत व न्युझीलंड यांच्या मालिकेतील दुसरी लढत भारताने तब्बल ६५ धावांनी जिंकताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
भारताने निर्धारित २० षटकांत न्युझीलंड समोर १९२ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान न्यूझीलंडला पेलवले नाही. न्युझीलंड संघाचा डाव १८.५ षटकांत सर्वबाद १२६ धावात आटोपला. कर्णधारपदाला शोभणारी फलंदाजी केन विल्यमसन करताना ६१ (५२चेंडू, ४ चौकार, २ षटकार) धावांची झुंजार खेळी केली. परंतु दीपक हुडाच्या भेदक गोलंदाजी समोर न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांनी नांगी टाकली.
दीपक हुडाने २.५ षटकांत केवळ १० धावांच्या बदल्यात ४ गडी बाद केले. त्याला यझुवेंद्रा चहल व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी २ गडी तर भुवनेश्वर कुमार व वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत सुरेख साथ दिली.
आजच्या कामगिरीने भारताने तीन लढतीच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पावसाने मालिकेतील पहिली लढत वाया गेली होती. मात्र, दुसऱ्या लढतीत विजयाने भारताचे पारडे जड झाले आहे. अंतिम लढतीसाठी कर्णधार हार्दिक पांड्या संघात बदल करून नवीन खेळाडूंना संधी देवू शकतो. या सामन्यात सूर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.