लोणी काळभोर, (पुणे) : मानस सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने अंकुर बाल रुग्णालय लोणी स्टेशन यांच्या वतीने थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जाधववाडी परिसरात मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी (ता. २०) सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे शिबीर पार पडले. या शिबिरात महिला, पुरुष व बालकांसहित १४७ जणांनी सहभाग घेतला होता. यावेळी आरोग्य तपासणी करून त्यांना उपलब्ध असलेली औषधे रुग्णांना मोफत देण्यात आली. तसेच वय वर्षे २ पेक्षा अधिक असणाऱ्या मुलांसाठी हेल्थी प्रोटीन (चॉकलेट) ड्रिंकची व्यवस्था करण्यात आली होती.
रुग्ण तपासणीसाठी लोणी स्टेशन येथील अंकुर बालरुग्णालय व बालरोग विभागाचे संचालक व साने गुरुजी हॉस्पिटल हडपसरचे विभाग प्रमुख डॉ. नितिन वाघमारे, (एम.डी.,पी.एच.डी. नवजातशिशु व बालरोगतज्ञ) डॉ. योगिता वाघमारे, बालचिकित्सक व स्तनपान व शिशु आहार तज्ज्ञ, संचालिका अंकुर बालरुग्णालय, लोणी स्टेशन, तसेच डॉ. योगेश कोटांगले, (एम. डी. पी. एच. डी. (आयु) मेडिसिन), डॉ. अंजना घोगरे, डॉ.ज्योती गवळी, जिगिशा गवळी यांची विशेष उपस्थिती होती.
या शिबिरात लहान मुलांचे सर्दी, खोकला, ताप, उलट्या -जुलाब, पोटदुखी इतर अनेक आजार तसेच संधिवात, पित्ताचे आजार, मलावरोध, अतिसार, पोटदुखी श्वसन विकार, अर्धशिशी इत्यादी अनेक आजारांसाठी तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली.
तसेच पोलेन फार्मा कंपनीचे गौरव यांनी लहान मुलांसाठी प्रोटीन चॉकलेट ड्रिंक उपलब्ध करून दिले. अंकुर बाल रुग्णालयातील नर्स काजल कागले व इतर सदस्यांनी रुग्ण नोंदणी व औषधे वाटण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
सदर शिबिराचे आयोजन जयभवानी तरुण मंडळ जाधववाडी, थेऊरचे अध्यक्ष प्रकाश फकिरा चव्हाण, कार्याध्यक्ष शहाजी राजाराम जाधव, उपाध्यक्ष अर्जुन वामन देवकर, जयसिंग रामभाऊ जाधव, खजिनदार तुकाराम राजाराम चव्हाण, गोपाल चव्हाण, नितीन जाधव, अनिल चव्हाण, विशाल जाधव, भाऊसाहेब देवकर यांनी केले होते. मान्यवरांच्या हस्ते शिबिरासाठी उपस्थित डॉ. नितिन वाघमारे आणि त्यांच्या सहकारी डॉक्टर व इतर सहाय्यक टीमचे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.