पुणे : इंदापूर शहरात सध्या महावितरणकडून जुने वीज मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र, या नवीन मीटरमुळे वीजबिलात मोठी वाढ होत असल्याची भीती सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. लोकांच्या मनातील हाच संभ्रम लक्षात घेऊन इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने शनिवारी (दि. 4) महावितरणचे सहाय्यक अभियंता बबलू प्रसाद यांची भेट घेतली आणि त्यांना मागण्यांचे एक निवेदन सोपवले. या संपूर्ण प्रक्रियेचा प्रशासनाने पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बदलू नका

नागरी संघर्ष समितीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, नवीन स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी महावितरणने संबंधित ग्राहकाची लेखी पूर्वसंमती घेणे गरजेचे आहे. कोणत्याही ग्राहकाच्या इच्छेविरुद्ध किंवा त्याला अंधारात ठेवून त्याच्या घरचे मीटर बदलण्यात येऊ नये. सद्यस्थितीत अनेक वीज ग्राहकांच्या मनात या नवीन प्रणालीबद्दल शंका आणि आक्षेप आहेत, त्यामुळे प्रशासनाने आधी लोकांचा विश्वास संपादन करावा.
वीजबिल वाढल्यास पडताळणीची मागणी
समितीने निवेदनात पुढे म्हटले आहे की, जर स्मार्ट मीटर बसवल्यानंतर एखाद्या ग्राहकाचे वीजबिल अचानक वाढले, तर महावितरणने त्याची तातडीने पडताळणी करावी. तपासणीत जर जास्त रक्कम आकारली गेल्याचे समोर आले, तर ती रक्कम पुढील महिन्याच्या वीजबिलात समायोजित करून ग्राहकाला दिलासा देण्यात यावा.
यासोबतच, कोणत्याही ग्राहकाला आधी पूर्वसूचना न देता त्याचा वीजपुरवठा अचानक खंडित करू नये, अशीही आग्रही मागणी करण्यात आली आहे. महावितरणने या सर्व तक्रारींची दखल घेऊन आपली अधिकृत भूमिका जाहीर करावी, असेही यात नमूद आहे.
या निवेदनावर भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर, प्रा. कृष्णाजी ताटे, कैलास कदम, हमीद अत्तार, महादेव चव्हाण, गोरख शिंदे, श्रीमती विजयाताई कोकाटे, पै. पांडुरंग शिंदे, अशोक अनपट, रघुनाथ खरवडे, भारत बोराटे, राजेंद्र चव्हाण, सुनील मखरे, सोनू सय्यद आणि चंद्रकांत धनवे यांच्यासह समितीच्या इतर अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता महावितरण प्रशासन जनतेच्या या भावनांचा आदर करून काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





