लोणी काळभोर : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आळंदी म्हातोबा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे सुमारे ८ लाख रुपयांच्या CSR निधीतून नूतनीकरण करण्यात आले. विलो मॅथर अँड प्लॅट पंप्स प्रा. लि., चिंचवड आणि रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला असून, नूतनीकरण झालेल्या आरोग्य उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

आरोग्य उपकेंद्राच्या नूतनीकरणामध्ये इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी, वॉटरप्रूफिंग, नवीन पाण्याची टाकी, वॉटर फिल्टर, वॉटर कुलर, संगणक, प्रिंटर, टेबल, बेबी वॉर्मर, फ्रिज, इन्व्हर्टर, बॅटरी, दरवाजे, स्वच्छतागृह तसेच आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता या उपकेंद्रात रुग्णांना अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक वातावरणात आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून, विशेषतः गर्भवती महिला व प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.

यावेळी बोलताना रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टचे अध्यक्ष पवनदीप सिंग कोहली यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आरोग्य कर्मचारी आणि रुग्ण दोघांनाही अधिक चांगल्या वातावरणात सेवा देणे शक्य होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
विलो कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट नितीन आसलकर यांनी सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत, ग्रामीण विकासासाठी उद्योगसंस्थांनी अशा लोकहिताच्या उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घ्यावा, असे मत व्यक्त केले. भविष्यातही समाजोपयोगी प्रकल्पांसाठी कंपनीची बांधिलकी कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संदीप शिवरकर, ईश्वर जाधव, सुनील वाघमारे आणि मोहन आंगडी यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुक्याचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी गावाच्या विकासासाठी होत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत, या प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था व मान्यवरांचे आभार मानले.
या लोकार्पण सोहळ्यास पवनदीप सिंग कोहली (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट), नितीन आसलकर (व्हाईस प्रेसिडेंट, विलो कंपनी), जी. के. शर्मा, विपिन घाटे, सचिन देशपांडे, अनिल सप्रे, श्रीकांत शिरोडकर, मोहन आंगडी, संथिल कुमार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे, डॉ. रूपाली लोखंडे, डॉ. रूपाली भंगाळे, डॉ. प्रेरणा वाघमारे, सारिका भिसे, सुनील वाघमारे, सचिन गायकवाड, उपसरपंच दयानंद शिवरकर, शंकर जवळकर, लक्ष्मण भोंडवे, रतन झेंडे, मोहन जवळकर, ईश्वर जाधव, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक सुनील वाघमारे यांनी केले, तर मा. उपसरपंच लक्ष्मण भोंडवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमामुळे आळंदी म्हातोबा परिसरातील आरोग्य सेवेला नवे बळ मिळाले असून, ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.






