अहिल्यानगर: पत्नीचे लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध आणि त्यातून निर्माण झालेल्या वादातून एका ३२ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गणेश मच्छिंद्र गायकवाड (वय ३२, रा. कमलपूर, ता. श्रीरामपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. शिंगवे नाईक येथे त्याला मारहाण करून ठार मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह राहुरी कृषी विद्यापीठाजवळील मुळा धरणाच्या बॅकवॉटर कालव्यात फेकून दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी महेश राजेंद्र जाधव आणि योगेश राजेंद्र जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश जाधव याची पत्नी शुभांगी हिचे गणेश गायकवाड याच्याशी लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध होते. गणेश हा शुभांगीला भेटण्यासाठी शिंगवे नाईक येथे आला होता. त्यावेळी महेश आणि योगेश यांनी त्याला पकडून मारहाण केली. या मारहाणीत गणेशचा मृत्यू झाला. त्यानंतर घटनेची माहिती बाहेर येऊ नये आणि गुन्ह्याचा पुरावा नष्ट व्हावा, या उद्देशाने दोघांनी मृतदेह मुळा धरणाच्या बॅकवॉटर कालव्यात फेकून दिल्याची माहिती तपासात समोर आली.

गणेशचा भाऊ प्रदीप मच्छिंद्र गायकवाड (वय ३४, रा. कमलपूर, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात हत्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. महेश जाधव हा राहाता तालुक्यातील जळगाव येथे लपून बसल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून त्याला ताब्यात घेतले.

दुसरा आरोपी योगेश जाधव हा राहुरी येथील मुळा धरण परिसरात लपल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यालाही ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांकडे सोपवण्यात आले.
आरोपींच्या चौकशीत गणेशचा मृतदेह कालव्यात फेकल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. अखेर राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढा येथे मृतदेह आढळला. नातेवाइकांनी मृतदेहाची ओळख गणेश गायकवाड अशी पटवली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने २४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पुढील तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि नगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.






