IND vs NED : बेंगळुरू: श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी शतके झळकावून भारतीय संघाची लय कायम ठेवली, जी कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने वेगवान सुरुवातीपासूनच गाठली. अय्यर आणि राहुल यांच्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी अर्धशतके झळकावून भारताला 50 षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात 410 धावांपर्यंत मजल मारण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. ही भारताची वनडेतील दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. भारतीय फलंदाजांसमोर नेदरलँडचे गोलंदाज जवळपास सर्वच फ्लॉप ठरले.
एकदिवसीय विश्वचषक 2023 चा शेवटचा साखळी सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यरने नाबाद १२८* आणि केएल राहुलने ६२ चेंडूत १०२ धावा केल्या. या सामन्यात, एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच भारतीय संघाच्या टॉप-5 फलंदाजांनी 50 धावांचा टप्पा पार केला. केएल राहुल हा एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता.
पप्रथम फलंदाजीला उतरल्यावर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 71 चेंडूत 100 धावांची शानदार भागीदारी केली. ही भागीदारी 12व्या षटकात शुबमन गिलच्या विकेटने तुटली. जो व्हॅन मीकरेनने त्याला झेलबाद केले. गिल 32 चेंडूंत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 51 धावा करून परतला. यानंतर 18व्या षटकात कर्णधार रोहित शर्मा डी लीडेचा बळी ठरला. रोहित 54 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा करून बाद झाला.
त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी 71 धावांची (66 चेंडू) भागीदारी केली, जी 29व्या षटकात कोहलीच्या विकेटसह संपली. 56 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार ठोकत कोहली व्हॅन डर मर्वेचा बळी ठरला. मर्वेने विराट कोहलीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
यानंतर चौथ्या क्रमांकावर असलेल्या श्रेयस अय्यर आणि पाचव्या क्रमांकावर केएल राहुल यांनी अशी नाबाद भागीदारी केली, ज्याचे उत्तर नेदरलँड्सच्या गोलंदाजांकडे नव्हते. दोन्ही शतकवीरांनी चौथ्या विकेटसाठी 208 (128 चेंडू) धावांची भागीदारी केली. यादरम्यान श्रेयस अय्यर 94 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 128 धावा करून नाबाद परतला. तर केएल राहुलने 64 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 102 धावा केल्या.
भारतीय गोलंदाजांनी नेदरलँडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. लोगान व्हॅन बीकने 10 षटकात 10.70 च्या इकॉनॉमीसह सर्वाधिक 107 धावा दिल्या. याशिवाय पॉल व्हॅन मीकेरेनने 10 षटकांत 90 धावा, बास डी लीडेने 10 षटकांत 82 धावा आणि रोएलॉफ व्हॅन डर मर्वेने 10 षटकांत 53 धावा दिल्या. आर्यन दत्तने 7 षटकांत 52 धावा आणि कॉलिन अकरमनने 3 षटकांत 25 धावा दिल्या. संघाकडून पॉल व्हॅन मीकरेन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे आणि बास डी लीडे यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.