IND vs AUS: मुंबई : सध्या भारतीय संघ मायदेशात खेळल्या जाणार्या वनडे विश्वचषक २०२३ मध्ये व्यस्त आहे. वर्ल्ड कपनंतर लगेचच टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार असून त्यात वेगवान गोलंदाजांचाही समावेश असेल हे निश्चित. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते.
वरिष्ठ गोलंदाजांच्या अनुपस्थितीत भुवी टीम इंडियाच्या वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करू शकतो. भुवनेश्वर गेल्या एक वर्षापासून भारतीय संघाबाहेर आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका त्यांच्यासाठी मोठी संजीवनी ठरू शकते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “निवडकर्ते वरिष्ठ गोलंदाजांना विश्रांती देऊ शकतात. अशा स्थितीत भुवनेश्वर कुमारसारख्या अनुभवी वेगवान गोलंदाजाची आपल्याला गरज आहे. त्याला पुन्हा बोलावता येईल.”
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधली कामगिरी चांगली
नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये भुवनेश्वर कुमारने चमकदार कामगिरी केली. त्याने 7 सामन्यात 9.31 च्या सरासरीने 16 विकेट घेतल्या आहेत. या कालावधीत त्याने 5.84 च्या इकॉनॉमीवर धावा खर्च केल्या. अशा स्थितीत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील कामगिरीही भुवनेश्वरसाठी संजीवनी ठरू शकते.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला
भुवनेश्वर कुमार 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता. त्यानंतर तो नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून टी-२० मालिका खेळला. मात्र, यानंतर त्याला संघात स्थान मिळवता आले नाही. भुवनेश्वर भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. आतापर्यंत त्याने 21 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 87 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 63, एकदिवसीय सामन्यात 141 आणि T20 मध्ये 90 बळी घेतले आहेत.